पारोळा राजमुद्रा दर्पण । पारोळा तालुक्यातील स्वतःच्या नावावर एक गुंठाही जमीन नसलेल्या अनेकांना शेतकरी दाखवून पीएम किसान योजनेचे ॲप्रोवल दिले, याचे पुरावे असताना, अनेक दिवसांपासून संबंधितांवर कोणतीही कारवाई होत नव्हती. त्यावरून पारोळा पोलिसांत सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पी. एम. किसान गैरव्यवहारप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा झाला असून, या गैरव्यवहाराचे धागेदोरे कुठपर्यंत आहेत, हे संशयितांकडून उघडकीस येणार आहे.
याबाबत तहसील कर्मचारी नईमोद्दीन मुजावर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की संशयित राहुल पाटील (रा. चोरवड), प्रशांत हाटकर (कामतवाडी), महेश खैरनार, देवीदास पाटील (दोघे मंगरूळ), संजय बाविस्कर (मोंढाळे प्र.उ.), सचिन पाटील ऊर्फ बाबाजी (शिरसमणी) यांनी आपले सरकार पोर्टलद्वारे अनधिकृतपणे लॉग इन आयडी व पासवर्डचा दुरूपयोग करून पी. एम. किसान योजनेत गैरमार्गाने संबंधित व्यक्तीस शेतकरी दाखवून योजनेचा लाभ मिळवून दिला. त्यावरून शासनाची फसवणूक केली. यावरून वरील संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.