नांदेड राजमुद्रा दर्पण। आज सकाळी ७ वाजेपासून तर संध्याकाळी ७ वाजेपर्यंत मतदानाची वेळ ठेवण्यात आली आहे. या जागेसाठी काँग्रेस आणि भाजपाने चांगलीच कंबर कसली आहे. शिवाय वंचित बहुजन आघाडीचा फंडा देखील येथे पाहायला मिळत आहे. आज पार पडणाऱ्या निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, यासाठी १ हजार ६७७ अधिकारी नेमण्यात आले आहे. नांदेडच्या देगलूर बिलोली विधानसभा मतदानसंघाच्या रिक्त जागेसाठी आज मतदान होणार आहे. दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त होती. त्यामुळे आज देगलूर बिलोली मतदारसंघाची पोटनिवडणुक होत आहे.
या पोटनिवडणुकीत एकूण १२ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, आरक्षित असणाऱ्या या मतदारसंघात महाविकास आघाडी, भाजपा, वंचित आघाडी अशी प्रमुख लढत पाहण्यास मिळणार आहे. या मतदारसंघ पोटनिवडणुकीत काँग्रेस तथा महाविकास आघाडीकडून जितेश अंतापूरकर, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुभाष साबणे तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. उत्तम रामराव इंगोले निवडणूक रिंगणात आहेत.
या निवडणूकीत ४१२ मतदान केंद्रावर मतदान होत असून, या मतदान प्रक्रियेत १ लाख ५४ हजार ९२ पुरुष मतदार, तर १ लाख ४४ हजार २५६ स्त्री मतदार व इतर ५ आणि शासकीय अधिकारी व कर्मचारी मतदाराची संख्या १८७ असून असे एकूण २ लाख ९८ हजार ५४० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
२०१९ साली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांना ८९ हजार ४०० मताधिक्य मिळाले मिळून विजयी झाले होते. त्याचप्रमाणे त्यावेळचे शिवसेना भाजप युतीचे उमेदवार सुभाष साबणे यांना ६६ हजार ५६० तर वंचित बहुजन आघाडीचे तत्कालीन उमेदवार रामचंद्र भरांडे यांना १३ हजार ३०० मते मिळाली होती.