बंगळुरू राजमुद्रा दर्पण। कन्नड चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे शुक्रवारी निधन झाले. पुनीत यांना जिममध्ये वर्कआउट करत असताना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना तातडीने बंगळुरूच्या विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डीसीपी सेंट्रलच्या म्हणण्यानुसार, पुनीत राजकुमार यांचे पार्थिव कांतीरवा स्टेडियममध्ये चाहत्यांना अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. बंगळुरूमध्येच त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची मुलगी वंदिता अमेरिकेहून परतल्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
पुनीत राजकुमार कन्नड सुपरस्टार डॉ. राजकुमार आणि पर्वतम्मा यांच्या पाच मुलांपैकी सर्वात लहान मुलगा आणि प्रख्यात स्टार KFI शिवराज कुमार यांचा धाकटा भाऊ आहे. पुनीत यांच्या पश्चात पत्नी अश्विनी रेवंत आणि दोन मुली असा परिवार आहे.
पुनीत राजकुमार यांच्या निधनामुळे संपूर्ण कर्नाटकात शोककळा पसरली आहे. राज्यातील सर्व चित्रपटगृहे बंद करण्यात आली आहेत. चाहत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हेही विक्रम हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. खबरदारी म्हणून बंगळुरूमध्ये दोन रात्री दारूविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
जामौली आणि सूर्या यांनी कार्यक्रम रद्द केला
कन्नड अभिनेते पुनीत राजकुमार यांच्या निधनामुळे शनिवारी होणारा सूर्या यांच्या जय भीम चित्रपटाचा ज्यूकबॉक्स लाँच आणि आरआरआर झलकचे रिलीज पुढे ढकलण्यात आले आहे. एवढेच नाही तर पुनीत यांचे मोठे भाऊ शिव राजकुमार यांच्या बजरंगी 2 चे शो देखील कर्नाटकात रद्द करण्यात आले आहेत.
पुनीत सध्या चेतन कुमार दिग्दर्शित ‘जेम्स’चे शूटिंग करत होते.ॲक्शन एंटरटेनर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुनीत यांनी शूटिंगचा मोठा भाग पूर्ण केला होता. या चित्रपटात त्यांच्यासह प्रिया आनंद होती. पुनीत यांना ‘द्वित्व’चेही शूटिंग सुरु करणार होते. नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये हा चित्रपट फ्लोअरवर येणार होता. पवनकुमारसोबत त्यांचे हे पहिले कोलॅबोरेशन होते.
पुनीत यांच्याकडे संतोष आनंदरामसोबत एक अनटाइटल्ड प्रोजेक्टही होता. या दोघांनी राजकुमारा आणि युवारत्न या चित्रपटात एकत्र काम केले होते. याशिवाय पुनीतकडे त्यांच्या होम बॅनरचे पाच चित्रपटही होते, ज्यांची निर्मिती ते करणार होते..