मुंबई राजमुद्रा दर्पण। तब्बल 27 दिवसांनंतर आर्यन खान तुरुंगाबाहेर आला आहे. मुलाला नेण्यासाठी स्वतः शाहरुख खान तुरुंगाबाहेर हजर होता. आर्यनला नेण्यासाठी मन्नतहून तीन एसयूव्ही गाड्या तुरुंगाकडे रवाना झाल्या होत्या. त्यापैकी एका कारमध्ये स्वतः शाहरुख होता. पूर्वी वृत्त होते की, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आर्यन थेट मन्नत या त्याच्या घरी न जाता वरळी येथील फोर सीझन हॉटेलमध्ये जाईल. पण आता शाहरुख आर्यनसह थेट मन्नतकडे रवाना झाल्याचे समजते. शाहरुख खानसह त्याचा अंगरक्षक रवी सिंग त्याला घेण्यासाठी आर्थर रोड जेलमध्ये पोहोचला होता.
आर्थर रोड जेलची जामीन पेटी आज पहाटे 5.30 वाजता उघडण्यात आली, त्यानंतर आर्यनच्या जामिनाची कागदपत्रे तुरुंगात पोहोचली. सकाळी आर्यनच्या सुटकेची सर्व कागदोपत्री कारवाई पूर्ण झाली. दरम्यान शाहरुखने आर्यनसाठी तीन एसयूव्ही गाड्यादेखील पाठवल्या. कारागृह अधीक्षक नितीन वायचळ यांनी सांगितले की, आर्यनच्या सुटकेचे आदेश प्राप्त झाले असून त्याची सुटका करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आर्यनचा मित्र अरबाज मर्चंटला घेण्यासाठी त्याचे वडील अस्लम मर्चंटही आर्थर रोड जेलबाहेर पोहोचले आहेत.
शुक्रवारी सायंकाळी उशिरा त्याचा जामीन आदेश कारागृहाच्या जामीन पेटीत पोहोचला होता, मात्र सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत तो तुरुंग अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला नाही. वकील सतीश मानशिंदे हे स्वत: सत्र न्यायालयातून जामिनाची कागदपत्रे घेऊन आर्थर रोड कारागृहाकडे रवाना झाले होते, मात्र त्यांना पोहोचण्यास उशीर झाला. यापूर्वी अभिनेत्री जुही चावलाने सत्र न्यायालयात पोहोचल्यानंतर आर्यनच्या जामीनपत्रावर स्वाक्षरी केली होती.
जामिनाची प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे आर्यनला शुक्रवारची रात्र आर्थर रोड कारागृहात काढावी लागली. तुरुंगातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, शनिवारी सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत तुरुंगातून बाहेर येऊ शकतो.