सातारा राजमुद्रा दर्पण । सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ईडीची नोटीस देण्यात आली आहे. त्यानंतर उदयनराजे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे. ही बँक गरीब शेतकरी सभासदांची आहे ती राहू द्या. त्यांची जिरवू नका, असं उदयनराजे हात जोडून म्हणाले.
मेहरबानी करा माझी कुणी जिरवू नका. मी कुणाचा दुश्मन नाही. ही बँक गरीब शेतकरी सभासदांची आहे. ही बँक राहूद्या. त्यांची जिरवू नका ही विनंती. ते कोण मला पॅनलमध्ये घेणारे, मी ठरवतो कुठे जायचं. कुठल्याही परिणामांना मी घाबरत नाही. व्हायचं ते होऊ द्या, असं उदयनराजे माध्यमांशी बोलताना म्हणाले.
दरम्यान, साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील चिमणगावमधल्या चर्चित जरंडेश्वर कारखान्याच्या कर्ज प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ईडीने सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला नोटीस पाठवण्यात आली होती. सातारा जिल्हा बँकेने जरंडेश्वरला 96 कोटींचे कर्ज दिले असल्याच्या खुलाशाबाबत ही नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्हा बँकेने कर्ज देताना कोणत्या आधारावर दिलं, कागदपत्रांची पूर्तता नेमकी कशी केली गेली होती, कर्ज प्रकरणाची प्रोसेस नेमकी कशी झाली, ही प्रोसेस होताना नियम आणि अटींचं पालन झालं होतं का? अशा पद्धतीने ईडी तपास करण्याची शक्यता होती.
त्यानंतर आता यातून ईडी या कर्जाची संचालकांकडून वसुली करणार आहे. जे संचालक या जबाबदार आहेत, त्यांच्याकडून वसुली व्हावी. हे बँकेवर निवडून जातात आणि आम्ही गेलो की जागा अडवली काय? मी जागा अडवली असेल तर मग सगळ्यांनाच बाहेर काढा. ज्यांनी-ज्यांनी सहकारी संस्था मोडीत काढल्या त्यांनी दहा तारखेच्या आत जिल्हा बँकेतून अर्ज मागे घ्यावेत. तसं झालं तर माझी सपशेल माघार असेल, असं आव्हानच उदयनराजे यांनी बँकेचे अध्यक्ष आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना दिलं आहे.