जळगाव राजमुद्रा दर्पण । शहरात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरीकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करुन उत्सव साजरा करणे उचित होणार नाही. उत्सव साजरा करतांना सर्व नागरीकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. जळगाव जिल्ह्यात कोव्हिड-19 मुळे उद्धभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या असून या सुचनांचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे असे आवाहन केले आहे.
दीपावली उत्सवा दरम्यान कपडे/फटाके/दागदागिने व इतर वस्तु खरेदी करण्यासाठी दुकानांत व रस्त्यावर गर्दी होत असते. नागरीकांनी शक्यतोवर गर्दी टाळावी. विशेष करुन ज्येष्ठ नागरीक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडण्याचे टाळावे. तसेच मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे, जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग/संक्रमण वाढणार नाही.
दीपावली या उत्सवा दरम्यान दरवर्षी मोठ्या प्रमाणांवर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येते. त्यामुळे वायु व ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढुन जनसामान्यांच्या तसेच प्राणीमात्रांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम दीपावली उत्सवानंतर बराच कालावधीपर्यंत दिसून येतात. कोरोना आजार झालेल्या किंवा होऊन गेलेल्या नागरीकांना फटाकांच्या धुरामुळे वायु प्रदुषणाचा त्रास होण्याची भीती आहे ही बाब विचारात घेऊन नागरीकांनी चालू वर्षी फटाके फोडण्याचे टाळावे. त्याऐवजी दिव्यांचा आरास करुन उत्सव साजरा करावा. दिपावली पहाट आयोजित करतांना सदर मार्गदर्शक सुचनांमधील नियमांचे काटेकोर पालन होईल याची दक्षता घ्यावी. शक्यतोवर अशा कार्यक्रमांचे ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुक इत्यादी माध्यमांद्वारे प्रसारण करण्यावर भर देण्यात यावा.
कोविड-19 या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरु होणाच्या मधल्या कालावधीत अजून काही सुचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करणे आवश्यक राहील.