पंढरपूर राजमुद्रा दर्पण । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची कार्तिकी यात्रा भरवण्याबाबत मंदिर समिती सकारात्मक असून तसा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविला जाणार आहे. कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने येत्या ६ नोव्हेंबरपासून विठ्ठल- रुक्मिणीचे २४ तास दर्शन देण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिलेली आहे.
मागील दोन वर्षानंतर यंदा कार्तिकी यात्रा भरवण्याचे नियोजन सुरू आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने कार्तिकी यात्रेबाबत सकारात्मकता दर्शवली आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये कार्तिकी यात्रा भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान भाविकांना फक्त मुखदर्शन देण्यात येणार आहे.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला देशभरातील भाविकांनी जवळपास २८ किलो सोने व ९६ किलो चांदी दान मिळाली आहे. हे सोने वितळवून त्यापासून देवाला घालण्यासाठी विविध दागिने व अलंकार बनवण्यात येणार असल्याची माहिती औसेकर महाराज यांनी दिली.