नंदुरबार राजमुद्रा दर्पण । गावातील एका महिलेला काही जणांनी डाकीण ठरवून ती महिला मंत्र- तंत्र व जादूटोणा करते आणि त्यातून माणसे, गुरे, जनावरे मारते असे आरोप करत महिलेला मारहाण होत होती.
जांगठी हे अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागात व नर्मदा किनाऱ्यावर वसलेले गाव आहे. या भागात दळणवळण व इतर सोयी सुविधांचा मोठा अभाव आहे. गावातील एका महिलेला काही जणांनी डाकीण ठरवून ती महिला मंत्र- तंत्र व जादूटोणा करते आणि त्यातून माणसे, गुरे, जनावरे मारते असे आरोप करत महिलेला मारहाण होत होती. गेल्या वर्षभरापासून हा प्रकार गावात सुरू होता. याप्रकरणी पीडित महिलेने मोलगी पोलिस ठाण्यात तक्रारही दिली होती व आरोपींवर विनयभंग तसेच इतर आरोपांखाली गुन्हा दाखल केला होता. मात्र तरीही पीडितेला डाकीण ठरवून तिची अवहेलना व दिला जाणारा त्रास कमी होत नव्हता. यामुळे बुधवारी (ता.२७) सहायक पोलिस निरीक्षक श्री. निळे, सुमित्रा वसावे, शीतल पाडवी, सामाजिक कार्यकर्ते किरसिंग वसावे हे जांगठी येथे पोचले. त्यांनी पीडितेसह गावातील पंचांच्या मध्यस्थीने त्रास देणाऱ्यांनाही बोलावून समजूत काढली. मात्र सातपुड्यात डाकिणचा प्रश्न आजही धगधगत असल्याचे वास्तव या घटनेतून समोर आले आहे.
जांगठी (ता. अक्कलकुवा) येथे एका महिलेला डाकीण ठरवून त्रास दिला जात असल्याप्रकरणी महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते व पोलिस प्रशासनाने गावात जाऊन प्रबोधन केले. यावेळी संबंधित व्यक्तींना पोलिस प्रशासनाने समज दिली असून यापुढे पीडित महिलेला कुठल्याही प्रकारचा त्रास दिला जाणार नसल्याचे त्यांनी पोलिसांना व अंनिसला लिहून दिले आहे. दरम्यान, या प्रकरणी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे पाठपुरावा केल्यामुळे पीडितेला दिलासा मिळाला आहे.