औरंगाबाद राजमुद्रा दर्पण । मुस्लिम आरक्षणासाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारण्यात आलाय. 27 नोव्हेंबर रोजी चलो मुंबईची घोषणा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलीय. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली आहे. मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएमचे कार्यकर्ते मुंबईपर्यंत तिरंगा रॅली काढणार असल्याचं जलील यांनी जाहीर केलंय.
मुस्लिम आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून तरुण तिरंगा रॅलीत सहभागी होतील, असं जलील यांनी सांगितलं. मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण देण्याच्या मागणीसाठी ही रॅली काढली जाणार आहे. महमूद उर रहेमान कमिटीने सांगितलं आहे की मुस्लिम समाज आर्थिक आणि शैक्षणिक मागास आहे. उच्च न्यायालयानेही मुस्लिमांचे आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण मान्य केलं आहे. दलितांनंतर मुस्लिम मागास आहेत, असं जलील म्हणाले.
दुसरीकडे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवेसी यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्याचे संकेतही दिले आहेत. राजकारणात काहीही अशक्य नसतं. कहीधी काहीही होऊ शकतं. जर त्यांची तयारी असेल तर आम्ही नक्की आघाडी करु, असं ओवेसी म्हणाले. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लग्न करतात हे कुठलं सेक्युलॅरिझम आहे? असा खोचक सवालही त्यांनी केलाय.