मुंबई राजमुद्रा दर्पण । भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या अनुषंगाने काही आरोप केले आहेत. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर तोफ डागली आहे. हमाम में सब नंगे है. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये. आमच्याही हातात दगड असू शकतात, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
संजय राऊत माध्यमांशी बोलताना ही टीका केली. ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण सुरू आहे. एकमेकांवर आरोप करणं सुरू आहे, एकमेकांना खोट्या आरोपात फसवणं सुरू आहे, केंद्रीय चौकशी समितीचा गैरवापर करणं सुरू आहे, पूर्वी असं कधी घडलं नाही. आता दोन वर्षात हे सुरू झालंय. हे महाराष्ट्राचं राजकारण नाही. आता यात शरद पवारांनाही घुसडले आहे. भाजपच्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे. आपल्या राजकारणासाठी पवारांसारख्या मोठ्या नेत्यांवर टीका करत आहेत, असं राऊत म्हणाले.
राजकारण म्हटलं तर हमाम में सब नंगे होते है. मलिक यांनी काही पुरावे दिले आहेत. विरोधकांना सांगतो. ज्यांचे घर काचेचे असते त्यांनी इतरांवर दगडफेक करू नये. आमच्याही हातात एक दगड असू शकतो. आम्ही तुमच्या एवढे खाली येणार नाही. आम्ही कमरेखालचा वार केला नाही. पवारांनी संस्कार असलेलं राजकारण केलं आहे, असं राऊत म्हणाले.