जळगाव राजमुद्रा दर्पण । जामनेर तालुक्यातील ग्रामीण भागात चक्रीवादळामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोट्या प्रमाणात नुकसान झाले. नैसर्गिक आपत्तीमध्ये गरजूंना नेहमीच मदतीचा हात देणारी जळगावातील आर्या फाउंडेशन ही संस्था या शेतकरी कुटुंबाच्या मदतीला धावून आली. या कुटुंबांची दिवाळी सुखकर आणि आनंदात जावी, या हेतूने दिवाळीच्या आधीच एकूण ५० कुटुंबांना महिनाभराचे किराणा सामान आर्या फाउंडेशनतर्फे देण्यात आले.
जामनेर तालुक्यातील सामरोद, मांडवे, कापूसवाडी, ढालसिंगी, भागदरा, नांद्राहवेली या गावांतील एकूण ५० दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जामनेर येथील पाटील ट्रेडर्स येथे किराणा सामानाचे वितरण करण्यात आले. गेल्या आठवड्यात संजयकुमार पाटील आणि किरण पाटील यांनी वरील गावांना भेट देत योग्य त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी तयार केली.
आर्या फाउंडेशनच्या अध्यक्ष तथा नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी तालुक्यातील अन्य नुकसानग्रस्त कुटुंबांनादेखील मदतीचे आश्वासन दिले. त्यांनी आर्या फाउंडेशनला आर्थिक मदत पोचविणाऱ्या सर्व दानशूरांचे आभार मानले. संजयकुमार पाटील, किरण पाटील, जितेंद्र पाटील, ललित जैन, संजित पाटील, पूनम पाटील, आर्या पाटील, गजानन कचुवा, भूषण चौधरी, मुकेश शिवदे, सचिन सपकाळे, शरद लाव्हरे यांनी सहकार्य केले.