पुणे राजमुद्रा दर्पण । देशात पेट्रोलचे भाव 121 रुपयांवर तर डिझेलचे भाव 112 रुपयांच्या वर जाऊन पोहोचले आहेत. या इंधन दरवाढीनं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. आर्यन खान जितके दिवस जेलमध्ये होता, त्या दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे भाव किती वाढले आहेत ते बघा. पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपने 58 कोटी रुपये सिग्नल रिपेअरिंगसाठी खर्च केले आहेत. कॉपी करुन पास झालेल्या लोकांनी पुणेकरांचं वाटोळं केलंय. आमचं सरकार हे सत्याचं आणि संघर्षाचं सरकार आहे. अजून दिल्लीत आपलं सरकार यायचं आहे. दिल्लीत आपलं सरकार आल्यावर पहिल्यांदा गॅसचे दर कमी करणार, अशी घोषणाहि सुप्रिया सुळे यांनी केली.
अनिल देशमुखांच्या मुद्द्यावरही सुळे यांनी भाष्य केलं. त्यांना ईडीची नोटीस आली होती. म्हणून ते ईडीच्या कार्यालयात गेले आहेत. ही चांगली गोष्ट आहे. आमच्यावर सातत्याने खोटेनाटे आरोप केले जात आहेत. जे एखाद्या संस्थेनं बोलायला हवं ते प्रवक्ते बोलत आहेत, असा टोला सुळे यांनी नाव न घेता किरीट सोमय्यांना लगावला. तर नवाब मलिक यांनी फडणवीसांवर केलेल्या गंभीर आरोपांबाबत बोलताना, मलिक यांनी काय आरोप केले ते मी ऐकलं नाही. त्यांची आजची पत्रकार परिषद पाहिली नाही. आमचं दडपशाहीचं सरकार नाही. देवेंद्र फडणवीस यांना काय बोलायचं तो त्यांचा प्रश्न आहे, असं सुळे म्हणाल्या.