मुंबई राजमुद्रा दर्पण । 100 कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केलेली आहे. ही अटकेची कारवाई दुर्दैवी आहे. अनिल देशमुख चौकशी यंत्रणेला सहकार्य करत असताना त्यांना अटक होणं दुर्देवी आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलेली आहे.
अनिल देशमुख गेले अनेक दिवस फरार होते. ईडीने अनेक वेळा समन्स दिल्यानंतरही ते ईडी कार्यालयात हजर राहत नव्हते. परंतु काल सकाळी साडे दहा-अकराच्या सुमारास ते अचानक ईडी कार्यालयात हजर झाले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी 13 तास त्यांची मॅरेथॉन चौकशी केली. अखेर मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास देशमुख यांना अटक करण्यात आली. देशमुखांच्या अटकेनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. रोहित पवार यांना या प्रकरणी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी भाजप आणि परमबीर सिंग यांच्यावर हल्लाबोल केला.
अनिल देशमुख चौकशीत सहकार्य करत असताना त्यांना अटक होणं दुर्दैवी आहे. आरोप करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संपत्तीचा शोध घ्यावा. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंग बेपत्ता आहेत, ते जर परदेशात गेले असतील तर त्यांना कुणाची साथ आहे? असा सवाल रोहित पवार यांनी यावेळी विचारला.