मुंबई राजमुद्रा दर्पण । काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी काल विरोधकांना दिला होता. राऊत यांनी आज थेट 2024नंतर भेटू. तुमच्याही फायली तयार आहेत. तेव्हा भूमिगत होऊ नका, असा सज्जड इशाराच दिला आहे. कितीही उड्या मारा आणि नाचत राहा. त्यानंतर जे होणार आहे ते पाहू. मग बघा केंद्रीय तपास यंत्रणा कुणापुढे गुडघे टेकतात ते. तेव्हा तुम्ही भूमिगत होऊ नका. तुमच्याही फाईली तयार आहेत. तुमच्याही कुटुंबाच्या संपत्ती आहेत. कशा प्रकारे आणि कुठे आहेत हे आमच्याकडे आहे, असा इशारा राऊत यांनी दिला.
कारवाईसाठी फक्त एकनाथ खडसेंचे नातेवाईक आणि नवाब मलिकांचे जावई दिसतात का? इतरांचे नातेवाईक का दिसत नाही? हे क्रुर लोकं आहेत. राक्षस गणातील लोकं आहेत. हे हिंदुत्वाचे नाव घेतात. पण हिंदुत्वाची व्याख्या अशी नाहीये. अटकासटका केल्या तरी सरकार पडणार नाही. महाराष्ट्रात कायम चांगलं राजकारण होतं. आता ते बिघडवलं जात आहे. त्याची जबाबदारी भाजपवर राहणार आहे. ते हे सर्व पाहून टणाटणा उड्या मारत आहेत. पण एक दिवस त्यांना तोंड लपवून फिरण्याची वेळ येईल. काही लोकं म्हणतात दिवाळी नंतर असं करू तमूक करू. पण या सर्वांना बाथरुममध्ये तोंडं लपवून बसावे लागेल अशा प्रकारचे स्फोट दिवाळीनंतर होऊ शकतात, असा इशारा देतानाच पण करायचे का आम्ही? तुमच्या कुटुंबापर्यंत पोहोचायचे का? असा सवाल त्यांनी केला.
देशमुखांवर आरोप करणारे जे लोकं आहेत ते आरोप करून पळून गेले नाही. त्यांना पळवून लावले आहे. पळून जाणारा व्यक्ती केंद्रीय सत्तेच्या मदतीनेच पळून जाऊ शकतो. पोलीस खात्याचा आयुक्त असलेला अधिकारी हा देश सोडून जातो. तेव्हा केंद्रीय सत्तेचं पाठबळ असल्याशिवाय तो पळून जाऊ शकत नाही. त्याने आरोप केला आणि पळून गेला. त्या आरोपांच्या आधारावर केंद्रीय तपास यंत्रणा तपास करत आहे. माजी गृहमंत्र्यांना अटक केली जाते. चौकशी होऊ शकते. तपास होऊ शकतो. पण मला वाटतं हे सर्व ठरवून चाललं आहे. महाविकास आघाडीतील जे प्रमुख लोकं आहेत त्यांना त्रास द्यायचा आणि बदनामी केली जात आहे, असं त्यांनी सांगितलं.