मुंबई राजमुद्रा दर्पण । भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि मंत्र्यांवरील हल्लाबोल सुरुच आहे. सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार संजय राऊत, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. सर्व माफिया एकत्र येऊन महाराष्ट्र लुटत आहेत, असा घणाघात सोमय्या यांनी केलेला आहे.
जरंडेश्वर कारखाना, दिल्लीची संपत्ती, गोव्यातील रिसॉर्ट, पुणे, बारामती आणि त्यासोबत नरिमन पॉईंटमधील निर्मल टॉवरमध्ये पार्थ पवार यांचे कार्यालय आयकर विभागाने जप्त केलंय. अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार, त्यांच्या दोन्ही बहिणी, जावई, मुलगा पार्थ आणि आशाताई पवार यांचीही नावं बेनामी मालमत्तेत टाकल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय. अनिल देशमुख आणि अजित पवार भष्ट्राचार करत आहेत, वाईट वाटते. दोन माफिया एकत्र येऊन महाराष्ट्रात लूट करत आहेत. घोटाळ्याचा पैसा हा नातेवाईकांच्या नावे करण्याचं काम ठाकरे आणि पवार सरकारच करु शकतं, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावलाय.
अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आलीय. त्या पार्श्वभूमीवर बोलताना अनिल देशमुख यांना तोंड उघडावे लागेल. त्यांचे पीएनं उघडलं आहे. पवार आणि ठाकरे सरकारकडे कोण, कसे पैसे पोहोचवत आहे हे सर्व समोर येईल. ही क्रांती आहे. निश्चितपणे अजून नावं समोर येतील आणि कारवाई होईल. दिवाळीनंतर अजून काही मंत्र्यांचे घोटाळे समोर येणार आहेत, असा इशाराही सोमय्या यांनी यावेळी दिलाय.