पाचोरा राजमुद्रा दर्पण । महाविकास आघाडी सरकारवर टीका करणे हा त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे. भाजप म्हणजे अफवा फैलविणारे खाते आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी काय दिले, असे म्हणणाऱ्या खासदार उन्मेष पाटील यांचे डोळे फुटले आहेत काय? जबाबदार खासदारांना हे शोभेसे नाही. आपण दोन वर्षांत काय काम केले, असे म्हणत माजी मंत्री गिरीश महाजन गेल्यावेळी जलसंपदामंत्री असताना, त्यांनी काय बोंब पाडली? इंधन दरवाढीवर न बोलणाऱ्या भाजपवाल्यांना आमच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी खरमरीत टीका पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे आमदार किशोर पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात केली.
पालकमंत्री पाटील म्हणाले, की विरोधक टीका करतात, त्यांना उत्तर देण्याइतपत त्यांची लायकी नाही. आम्ही कामामुळेच सत्तेत आहोत, हे विरोधकांनी लक्षात घ्यावे. माजी मंत्री व जबाबदार खासदार काहीही बोलतात. जनतेची दिशाभूल करतात. जनता इतकी खुळी नाही. भाजपने अफवा खाते बंद करावे आणि लोकांच्या कामाकडे लक्ष द्यावे. शेतकऱ्यांना आम्ही काय दिले याचा पुरेपूर हिशोब देतो. समोर या, आपली काय बोंब पडली ते ही सांगा, असे खुले आव्हान त्यांनी दिले.
आमदार किशोर पाटील अत्यंत भावूक होऊन दहा वर्षांत केलेल्या व दृष्टीपथात असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या विकासकामांचा पाढा वाचला. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे येथे आल्यानंतर त्यांच्यासमोर रस्त्यांची व्यथा मांडली असता, त्यांनी ४५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. १७ कोटी रुपये खर्चाच्या तीन पुलांची कामे सुरू आहेत. शहरातील विविध मोकळ्या जागा विकसित करण्यासाठी निधी मिळाला असून, मोकळ्या जागांचा विकास पॅटर्न राज्यात महत्त्वपूर्ण ठरेल. शंभर टक्के मोकळ्या जागांचा विकास येत्या काळात होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.