जळगाव राजमुद्रा दर्पण । जळगाव येथे शतकोत्तर परंपरा लाभलेल्या शहरातील ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानतर्फे कार्तिकी एकादशीनिमित्त दहा दिवस चालणाऱ्या वहनोत्सवास परवानगी मिळालेली आहे. दुसरीकडे रथोत्सवाला परवानगीची प्रतीक्षा असून, जिल्हाधिकारी रथमार्गाची पाहणी करणार आहे.
जळगावचे ग्रामदैवत असलेल्या श्रीराम मंदिर संस्थानतर्फे कार्तिक प्रतिपदेपासून (बलिप्रतिपदा) वहनोत्सव साजरा केला जातो. प्रतिपदा ते द्वादशी असा हा वहनोत्सव असतो. एकादशीला श्रीराम रथोत्सव साजरा होतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी वहनोत्सव व रथोत्सव साजरा होऊ शकला नव्हता. कार्तिकी एकादशीला पाच पावले रथ ओढून हा उत्सव साजरा झाला. लोकोत्सव असलेल्या या उत्सवाला कोरोनाच्या मर्यादेमुळे भक्तांचा हिरमोड झाला होता.
फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आली, मार्च-एप्रिलमध्ये ती तीव्र झाली. मे महिन्यापासून लाट ओसरू लागली. ऑक्टोबरपर्यंत ती पूर्णपणे नियंत्रणात आली. नवरात्रोत्सवापासून मंदिरेही सुरू झाली असून, जवळपास सर्वच निर्बंध शिथिल झाले आहेत. त्यामुळे रथोत्सव, वहनोत्सवाला परवानगी मिळावी, अशी मागणी रथोत्सव समितीने केली होती. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत नुकतीच याबाबत बैठक झाली. त्यात मर्यादेत भक्तसंख्येत वहनोत्सवास परवानगी देण्यात आली. त्यानुसार बलिप्रतिपदेपासून वहनोत्सव सुरू होणार आहे.
रथोत्सवाला अद्याप परवानगी मिळालेली नाही. रथोत्सव मार्गाची पाहणी करून त्याबाबत निर्णय घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्यानुसार मंगळवारी सकाळी दहाला रथोत्सव समिती सदस्यांसमवेत जिल्हाधिकारी रथोत्सव मार्गाची पाहणी करतील आणि त्यानुसार रथोत्सवाबाबत निर्णय घेण्यात येईल.