(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा)
शहरातील प्रभाग क्र. १२ व १३ या दाट लोकवस्ती असलेल्या समतानगर परिसराला महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी भेट देऊन तेथील गटारींच्या स्वच्छतेसह घंटागाडी, सार्वजनिक शौचालये, अमृत योजनेंतर्गत झालेली कामे यांची गल्लीबोळात जाऊन पाहणी केली. माता रमाई आंबेडकर जलकुंभाजवळील श्री छत्रपती चौकापासून पाहणी दौरा सुरू करून हनुमान मंदिर, साई मंदिरासह त्याच्या पाठीमागील विहिरीनजीकचा परिसर, बजरंग चौक, आंबेडकर पुतळा आदी ठिकाणी भेट देऊन स्वच्छतेसंदर्भात आढावा घेतला. सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत या संपूर्ण भागात फिरून महापौर, उपमहापौरांनी या भागातील नागरिकांचे प्रश्न, अडचणी जाणून घेतल्या.
प्रभागाचे नगरसेवक नितीन बरडे, महापालिका सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त श्याम गोसावी, आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त पवन पाटील, शहर समन्वयक महेंद्र पवार, आरोग्य सुपरिटेंडेंट उल्हास इंगळे, आरोग्य निरीक्षक चेतन हलागडे, कुणाल बारसे, सुपरव्हायझर ऋषिकेश शिंपी, मुकादम नंदू पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी याप्रसंगी ठिकठिकाणी दिसून आलेल्या अस्वच्छतेबाबत महापालिका अधिकारी, कर्मचारी, मुकादम यांच्याशी चर्चा करून स्वच्छतेचे आदेश दिले. तसेच त्या-त्या भागातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत आस्थेवाईकपणे चौकशी करून, प्रश्न विचारून संबंधितांना आश्वासन देत महापालिका आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच मुकादम यांना आदेश दिले. घंटागाडी, शौचालय स्वच्छता, गटारींसदर्भात कोणत्याही तक्रारी नागरिकांकडून येणार नाहीत याची प्रकर्षाने काळजी घेण्यात यावी अन्यथा कारवाई करण्यात येईल असे आदेश दिले. याप्रसंगी अमृत योजनेंतर्गत नळ कनेक्शनसंदर्भातही काही महिलांनी महापौरांकडे गार्हाणे मांडले. त्यावर महापौर जयश्री महाजन यांनी संबंधितांना पाणीपट्टीचे पैसे भरा, तत्काळ नळकनेक्शन मिळेल, असे सांगितले.
समतानगरील स्वच्छतेच्या पाहणीवेळी महापौर जयश्री महाजन यांच्याकडे काही महिला गटार, शौचालय तसेच रस्त्यांच्या साफसफाईविषयी प्रश्न उपस्थित करीत होत्या. यावेळी त्यांनी संबंधितांना आपला मोबाईल क्रमांक असलेले व्हिजिटिंग कार्ड, तसेच कागदावरही स्वतःच्या हस्ताक्षरात मोबाईल नंबर लिहून देत अधिकारी, कर्मचारी, मक्तेदार ऐकत नसतील, तर थेट या क्रमांकावर संपर्क करून आपली समस्या सांगण्याचे आवाहन केले.