मुंबई राजमुद्रा दर्पण। नवाब मलिक हे सातत्याने एनसीबी आणि भाजप नेत्यांवर आरोप करत आहेत. दरम्यान रात्री उशीरा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ईडीकडून अटक करण्यात आली. असे असतानाच आज सकाळीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना देखील आयटीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. यानंतरपासून या कारवाईवर विविध राजकीय नेत्यांचा प्रतिक्रिया येत आहेत. आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी याविषयावर प्रतिक्रिया दिली आहे.
अनिल देशमुखांच्या अटकेवर प्रतिक्रिया देत असताना आठवले म्हणाले की, ‘अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री होते. त्यांच्यावर परमबीर सिंहांकडून 100 कोटी वसुलीबाबत आरोप करण्यात आलेले होते. याविषयी गेल्या काही महिन्यांपासून चौकशी सुरु होती. चौकशीनंतर आता त्यांना अटक करण्यात आली आहे. गृहमंत्रीपदाच्या काळात पदाचा दुरुपयोग केला असल्यानेच त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. त्यांनी वेळोवेळी चौकशीसाठी हजर राहण्याची आवश्यकता होती. अनेकवेळा ईडीकडून सवलत दिली जाते, कारवाई केली जात नाही. ईडीला पुरावे मिळाल्यानंतरच कारवाई करण्यात येते. अनिल देशमुख यांच्यावरील कारवाई योग्यच आहे’ असे मत आठवलेंनी व्यक्त केले आहे.