मुंबई राजमुद्रा दर्पण । विक्रमी संख्येने दर दिवशी कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याची राज्याची तयारी आहे. याला अधिक गती आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या 30 नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी पहिल्या डोसमध्ये संपूर्ण राज्याचे 100 टक्के लसीकरण व्हावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहे.
बैठकीस सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे दूरदृश्यप्रणालीव्दारे जालना येथून सहभागी झाले. वर्षा निवासस्थानावरील समिती कक्षात मुख्य सचिव सीताराम कुंटे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, आरोग्य सेवा आयुक्त एन. रामास्वामी, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन आयुक्त सचींद्र प्रताप सिंह, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे, कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले की, सुरवातीला कोविडची भीती होती. पण आता कोविड संसर्गाचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे नागरिकांनी बेफिकीर होऊ नये, यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. संसर्गाचे प्रमाण कमी होत असले तरी चाचणीचे प्रमाण कमी होता कामा नये. राज्यातील विविध ठिकाणी आपण प्रयोगशाळा विकसित केल्या. त्याचा वापर करायला हवा.
कोविडचे संसर्ग कमी झाला असला तरी अद्याप कोविड गेलेला नाही, याची जाणीव नागरिकांना सतत करुन द्यायला हवी. लस घेण्याबरोबरच कोविड सुसंगत वर्त़न ठेवण्यासाठी सतत जनजागृती मोहिम राबवावी. चित्रपटगृह सुरू केली जात आहेत. प्रत्येक चित्रपटगृहात लसीकरणबाबत संदेश दाखविण्यात यावेत, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.
सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लसीकरण मोहिमेत स्थानिक पदाधिकारी यांचा सहभाग घ्यावा. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर यांना लसीचे दोन्ही डोस अनिवार्य करण्यात यावेत. डोंगरी भागात मोबाईल युनिटच्या माध्यमातून लसीकरण करण्यात यावे, असे सांगितले.