मुंबई राजमुद्रा दर्पण । देशातील 3 लोकसभा आणि 29 विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकींचा काल निकाल लागला. या निकालानंतर अनेक राजकीय संदेश मिळतात आणि जनतेचा कौल कुठे आहे त्याचा अंदाज येतोय. 2022 मध्ये होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांपूर्वी आलेल्या या निकालानी राजकीय पक्षांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. पोटनिवडणुकीत ज्या पक्षाची राज्यात सत्ता आहे त्यांना फायदा होण्याचा ट्रेंड दिसला. काँग्रेसने अपेक्षेपेक्षा चांगले प्रदर्शन केले. हिमाचलमधील दणदणीत पराभव ही भाजपसाठी धोक्याची घंटा आहे, तर काँग्रेससाठी 2022 च्या निवडणुकीपूर्वी ती प्रोत्साहनाची घंटा मानली जात आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आहे. हिमाचलमधील लोकसभेच्या मंडी जागेवर आणि विधानसभेच्या तीन जागांच्या पोटनिवडणुका झाल्या होत्या. या चारही जागा काँग्रेसने जिंकल्या. मंडी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली होती. हिमाचलमधील पराभवामुळे भाजपमध्ये चिंतेची लाट पसरली आहे.
जुब्बल-कोटखाईजागेवर भाजपला डिपॉझीट पण वाचवता आलेला नाही इतके कमी मतं मिळाली. हिमाचलचे हे निकाल भाजपसाठीही अडचणीचे ठरणार आहेत कारण पुढील वर्षाच्या शेवटी राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि ही पोटनिवडणुक 2022 ची सेमीफायल मानली जात होती. अशा स्थितीत पोटनिवडणुकीचे हे निकाल काँग्रेससाठी टॉनिक ठरू शकतात. इतकेच नाही तर माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नीचा निवडणूक जिंकणे हिमाचलमध्ये काँग्रेससाठी उत्साह वाढवणारे आहे.