शिरपूर राजमुद्रा दर्पण । शिरपूर येथील कुटुंबातील कर्ता पुरुष गमावल्यामुळे झालेली हानी न भरून येणारी आहे. पण यापुढे कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर आहे याची जाणीव ठेवा आणि आपल्या मदतीला भावंडाप्रमाणे महसूल प्रशासन उभे आहे अशी खात्री बाळगा असे आवाहन प्रांताधिकारी प्रमोद भामरे यांनी केले. महसूल कर्मचारी संघटनेतर्फे तालुक्यातील 21 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांना साडीचोळी व मिठाई देऊन भाऊबीज साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. तहसीलदार आबा महाजन, नायब तहसीलदार ए.बी.पेंढारकर, मंडळाधिकारी व तलाठी उपस्थित होते.
दिवाळसणाच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी भामरे व तहसीलदार महाजन यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. संबंधित महिलांनी मांडलेल्या अडचणी अधिकाऱ्यांनी समजून घेत तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले. महसूल विभागाने केलेल्या सन्मानाबद्दल महिलांनी कृतज्ञता व्यक्त केली. पेंढारकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. मंडळाधिकारी पी.पी.ढोले, पी.के.मराठे, ए. सी.गुजर, अनिल भामरे, सुरेश बाविस्कर, ए.सी.गुजर, मनीषा गिरासे, व्ही.एम.वाघ व तलाठी संघटनेने संयोजन केले.
आत्महत्याग्रस्त शेतकरी मधुकर पाटील (आढे), नरेंद्र गुजर (वाडी बु), एकनाथ पाटील (घोडसगाव), गणेश कोळी (पिंप्री), यशवंत पाटील (भाटपुरा), रामचंद्र पाटील (कुवे), प्रवीण गुजर (अजनाड), सुभाष मराठे (वाघाडी), नथु अलकरी (कुरखळी), गोविंद पाटील (तऱ्हाडी), भाऊसाहेब पाटील (जुने भामपूर), श्यामराव पाटील (बाळदे), जगतराव शिरसाट (बभळाज), भटू राजपूत (उपरपिंड), महेंद्र महिरे (वनावल), यळबाई मराठे (थाळनेर), देवराम महाजन (शिंगावे), कपिल साळुंखे (थाळनेर), पंकज भदाणे (करवंद) व राजेंद्र गिरासे (पिंप्री) यांच्या कुटुंबातील महिला सदस्यांना सन्मानित करण्यात आले.