मुंबई राजमुद्रा दर्पण । केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचे 100 रुपये वाढवून 5 रुपये कमी केले आहेत. लोकांची चेष्टा लावली आहे. किमान 25 ते 30 रुपये तरी कमी करायला हवे होते, असं सांगतानाच मोठं मन दाखवायला मन मोठं लागतं. तुमचं मन कुजकं आणि सडकं आहे, असा हल्लाबोल शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे.
लोकांची चेष्टा चालली आहे का? मोठं मन दाखवायला मन असावं लागतं. मनच नाही तर मोठं मन काय दाखवणार. पाच रूपयांची नोट दाखवत आहात आम्हाला. किमान 25 रुपये कमी करायला हवे होते. नंतर 50 रुपये कमी करायला हवे होते. 100 रुपये वाढवायचे आणि 5 रुपये कमी करायचे हे कसलं मोठं मन? मग पेट्रोल-डिझेलचे भाव 100 रुपयांनी वाढवले हे पण मोठ्या मनाचं लक्षण आहे का? ज्याचं मन कठोर ते 100 ते 150 रुपयांची दरवाढ करू शकतात. लोकं पेट्रोल पंपावर आता 15 रुपये आणि 20 रुपयाचं पेट्रोल घेत असतात. समोर मोदींचा फोटो असतो. मोदी त्यांना आशीर्वाद देतात. आम्हाला मत दिल्याची किंमत चुकवा असं सांगत असतात. ठिक आहे. हे दिवसही जातील 2024 साली, असा चिमटा राऊत यांनी काढला.
पेट्रोल-डिझेलचे भाव राज्य सरकार वाढवत नाही. हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी कुणाकडे बोट दाखवलं? त्यांनी केंद्राकडे बोट दाखवलं म्हणून त्यांची बोटं छाटणार का? तुमचेच मुख्यमंत्री आहेत ना? भाजपचेच. तुम्हीच मायबाप ना? देशाचे धोरणात्मक निर्णय तुम्हीच घेता ना? मग बोट कुणाकडे दाखवायचं? अमेरिकेकडे दाखवायचं की बायडनकडे दाखवायचं? कुणाकडे दाखवायचं? की फ्रान्सच्या राष्ट्रपतींकडे दाखवायचं? असा सवाल त्यांनी केला.