अयोध्या राजमुद्रा दर्पण । दिवाळीच्या दिवशी भगवान श्रीराम अयोध्येला परतल्याच्या आनंदानिमित्त देशभर उत्सव साजरा होतो. या उत्सवाची पद्धत प्रत्येक ठिकाणी वेगळी असते. काळानुसार त्यात अनेक बदलही झाले आहेत. पण अयोध्येचे राजघराणे आजही आपल्या जुन्या परंपरेचे पालन करते. आजही राजघराणे दीपावली पूजनात कुलदैवत आणि कुलदेवीला उसाचा नैवेद्य दाखवते. कुबेर आणि लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते आणि मध्यरात्री परंपरेनुसार शरयूची आरतीही होते.
अयोध्येचे राजे जगदंबा प्रताप नारायण सिंह यांनी विमलेंद्र मोहन प्रताप मिश्रा आणि शैलेंद्र मोहन प्रताप मिश्रा यांना दत्तक घेतले होते. संपूर्ण कुटुंब अयोध्येच्या राजमहालात एकत्र राहते. राजघराण्यातील यतींद्र मिश्रा यांनी सांगितले की, राजघराण्यात कुबेर आणि लक्ष्मीच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. ही प्रथा शेकडो वर्षे जुनी आहे. गौरी-गणेश, अन्नपूर्णा, नवग्रह पूजनानंतर राजघराणे रात्री १० वाजता कुलदैवत भगवान महादेव यांचे हवन-पूजन करते. दिवाळीनिमित्त फक्त एक दिवसासाठी सोन्याच्या नाण्यांवरील गौरी, गणेश, कुलदैवत आणि कुलदेवी यांच्या प्रतिमा बाहेर काढल्या जातात. त्या दिवशी पूजा केल्यानंतर त्या पुन्हा तिजोरीत ठेवल्या जातात. कुलदैवताला तांदळाची खीर, सुरणाचे भरीत आणि हरभरा डाळीच्या पुरीचा नैवेद्य दाखवतात.
कनक भवनची पूजा आहे खास कनक भवन हे अयोध्येतील सर्वात सुंदर मंदिर मानले जाते. हे भवन कैकेयीने माता सीतेला दिले होते, अशी मान्यता आहे. दिवाळीच्या दिवशी येथे भगवान श्रीराम-जानकी यांचा महाअभिषेक होतो. त्यांना वस्त्रे-दागिने घातले जातात. अयोध्येत आगमनाच्या आनंदाप्रीत्यर्थ ५६ प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य भगवान श्रीरामांना दाखवला जातो. नंतर त्यांची महाआरती होते.