पुणे राजमुद्रा दर्पण । गेल्या काही दिवसांपासून पवार कुटुंबीयांशी संबंधितांवर आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत. त्याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारलं असता त्यांनी सूचक मौन पाळलं. अरे काही तरी चांगलं बोला, असं म्हणून शरद पवार यांनी हा विषय टाळला. शरद पवार यांनी दिवाळी निमित्ताने कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. यंदाची दिवाळी लोकांना साजरी करता यावी या विचारात आम्ही होतो. त्यामुळे काही निर्णय घेतला. लोकांनी काही सूचना आल्या. आम्ही मास्क लावू, शिस्त पाळू पण दिवाळी साजरी करू द्या अशा सूचना केल्या. या संकटाच्या वर्षातून आपण बाहेर निघत आहोत. आपण नेहमीचा कारभार नेहमीप्रमाणे करू. गेल्या दोन वर्षात झालेलं नुकसान भरून काढू. अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्था आपण सावरू. नव्या दमाने आपण पुन्हा एकदा कामाला लागू असा विश्वास आहे, असं पवार म्हणाले.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार आले नव्हते. त्याबाबत त्यांना विचारण्यात आलं. त्यावर अजित पवार यांना कदाचित कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. तसं डॉक्टरांनी सूचवलं. त्यांच्या सकाळी टेस्टही झाल्या. त्यांचा रिपोर्ट आला नाही. त्यामुळे एढ्या लोकांमध्ये मिसळण्याची रिस्क घेऊ नका असं मी त्यांना सूचवलं. त्यामुळे ते आले नाहीत, असं त्यांनी सांगितलं आहे.
केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलची दरवाढ कमी केली आहे. राज्य सरकार दरवाढ कमी करणार का? असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. त्याबाबत राज्य सरकारशी बोलावं लागेल. नागरिकांना दिलासा देण्याबाबत राज्य सरकारने सकारात्मकता दाखवली आहे. पण केंद्राकडे राज्याचं जीएसटीचं देणं आहे ते केंद्राने द्यावं. त्यामुळे लोकांना मदत करणारा निर्णय घेणं राज्य सरकारला शक्य होईल, असा टोला पवारांनी लगावला आहे.