लातूर राजमुद्रा दर्पण । व्यापाऱ्यांनी दुकानाच्या पुजा केल्या त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदीही. सलग सहा दिवस व्यवहार ठप्प असताना आज (शुक्रवारी) सोयाबानची विक्रमी आवक झाली होती. शिवाय दरही स्थिर असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
सोयाबीनच्या मुहूर्ताचा दर जरी कायम राहिलेला नसला तरी दराची फारशी चिंता न करता शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी दिवाळी पाडव्याचे मुहूर्त साधलेले आहे. सोयाबीनच्या दरातील चढ-उतारामुळे बाजारात नेमकी आवक काय राहणार हे अद्यापही सांगता येत नाही. मध्यंतरी सोयाबीनचे दर घसरले तेव्हा केवळ 8 हजार पोत्यांची आवक होत होती. शुक्रवारी मात्र, 40 हजार पोत्यांची आवक झाली होती. त्यामुळे पाडव्या दिवशी बाजारपेठेत नवचैतन्य पाहवयास मिळाले.
गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनचे दर हे स्थिर आहेत. केंद्र सरकारच्या कडधान्य साठा मर्यादेच्या निर्णयाची मुदत ही संपलेली आहे. त्यामुळे कदाचित व्यापाऱ्यांनी साठवणूकीला सुरवात केलेली आहे. त्यामुळेच दर हे स्थिर आहेत अशी शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, दर स्थिर असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. किमान दरात घसरण नाही हीच मोठी गोष्ट मानली जात आहे. त्यामुळे बाजारातील दराचा अंदाज नसतानाही लातूरसह उस्मानाबाद, बीड, अंबाजोगाई, सोलापूर, कर्नाटक येथून सोयाबीनची आवक झाली होती.