(मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा)
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी मुंबई येथे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांची भेट घेऊन त्यांना मुक्ताईनगर मतदारसंघातील गृह खात्यासंबंधित विविध मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनात यात प्रामुख्याने कुऱ्हा काकोडा येथे नविन पोलीस स्टेशनची निर्मिती व्हावी , मुक्ताईनगर, सावदा, बोदवड या पोलिस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची आणखी पदे मंजुर करण्यात यावी, मुक्ताईनगर येथे नूतन पोलीस स्टेशन इमारत, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय इमारत व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांचेकरिता शासकीय निवासस्थान इमारत बांधकाम करणे आणि आणि मुक्ताईनगर सावदा बोदवड येथे पोलिस कर्मचाऱ्यांसाठी असणारे जुने जीर्ण झालेली निवासस्थाने पाडून नविन निवासस्थानांचे बांधकाम करण्यात यावे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की कुऱ्हा काकोडा येथे मुक्ताईनगर पोलीस स्टेशन अंतर्गत आऊट पोस्ट असुन तिथे तिन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे. कुऱ्हाचे मुक्ताईनगर पासुन अंतर ३५ कि मी असुन कुऱ्हा परिसराला लागून ३० गावांचा समावेश आहे. याठिकाणी काही अनुचित घटना घडल्यास मुक्ताईनगर वरून पोलीस कुमक पोहचण्यास विलंब लागतो. दिवसेंदिवस या परिसरात गुन्ह्यांची नोंद वाढत असून यातील काही गुन्ह्यात परराज्यातील गुन्हेगारांचा समावेश आहे. सदर ठिकाणी एखाद वेळी मोठी अनुचित घटना घडल्यास परिसरात कायदा व सुव्यवस्था, शांतता अबाधित राहावी यासाठी कुऱ्हा येथे स्वतंत्र पोलीस स्टेशनची निर्मिती होणे जरुरी आहे. तरी कुऱ्हा येथे नुतन पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे.
मुक्ताईनगर मतदारसंघात सध्या स्थितीत मुक्ताईनगर, बोदवड, सावदा येथे पोलीस स्टेशन असून हा परिसर विदर्भ व मध्यप्रदेशच्या सीमेला लागून असून सातपुडा पर्वतरांगांच्या जवळ आहे. या पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या अपुर्ण पडत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने या पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनवर कामाचा ताण येतो. त्या कारणाने सावदा मुक्ताईनगर बोदवड येथील पोलीस कर्मचाऱ्यांची पद संख्या वाढवून देण्यात यावी ज्यामुळे या परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील व गुन्ह्यांचे प्रमाण नियंत्रणात आणता येईल याबाबत माहिती देण्यात आली.
मुक्ताईनगर येथे असणारी पोलीस स्टेशनची इमारत ही जुनी असून लहान आहे. तसेच मुक्ताईनगर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालयाला इमारत उपलब्ध नसून ते भाडेतत्त्वावर असलेल्या इमारतीत सुरू असून मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना शासकीय निवासस्थान उपलब्ध नाही. तरी मुक्ताईनगर येथे नूतन पोलीस स्टेशन इमारत, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांच्या निवासस्थानाकरिता शासकीय जागा उपलब्ध करून देऊन नविन इमारतींचे बांधकाम करण्यात यावे. तसेच मुक्ताईनगर, बोदवड, सावदा येथे असलेल्या पोलीस वसाहतीतील पोलीस कर्मचारी यांचे निवासस्थाना पैकी काही निवासस्थानांची पडझड झालेली आहे. तर काहींची जीर्ण अवस्था झालेली आहे. त्यामुळे जनतेची सुरक्षा करण्याऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या परिवाराला या निवासस्थानामध्ये भितीदायक वातावरणात राहावे लागते.
पावसाळ्यात या निवासस्थानांच्या छताला गळती लागते त्यामुळे एखादया वेळी निवासस्थानांची पडझड होऊन अनुचित घटना घडू शकते. तरी जीर्ण झालेल्या या पोलिस निवासस्थानांना जमीनदोस्त करून नविन निवासस्थानांची निर्मिती करण्यात यावी असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सकारात्मकता दर्शवुन जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे कडून या विषयांवर माहिती व प्रस्ताव मागवुन घेऊन विषय मार्गी लावण्याविषयी आश्वासन दिले आहे.