धुळे राजमुद्रा दर्पण । राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून राज्यव्यापी संप पुकारला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत संप सुरू राहणार असून धुळे विभागात देखील पुर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे धुळे विभागातील सर्व बस सेवा बंद झाले आहे. रात्री बारा वाजेपासूनच एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. जोपर्यंत राज्य शासनातर्फे मागणी मान्य होत नाही तोपर्यंत हा संप असाच सुरू ठेवणार असल्याची भूमिका कामगारांनी घेतली आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलीनीकरण करून शासन नियमाप्रमाणे सर्व सोयी, सवलती, वेतन, भत्ते लागू करावेत या मागण्यांसाठी राज्यभरात विविध ठिकाणी महामंडळाचे कर्मचारी आंदोलन करत आहेत. राज्यातील काही आगारातील कर्मचारी यापूर्वीच संपावर गेल्याने त्या-त्या ठिकाणची एसटीची सेवा पूर्णपणे बंद झाली आहे. या संपाला इतर आगारातील कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान, आता महामंडळाच्या धुळे आगारातील कर्मचाऱ्यांनीही संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार गोपीचंद पडळकर व महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अजयकुमार गुजर यांनी राज्यव्यापी एसटीचे राज्य शासनात विलीनीकरणासाठी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाच्या नोटिशीनुसार आम्ही या संपात सहभागी होत असल्याचा संदर्भ येथील कर्मचाऱ्यांनी दिला आहे. शासनाच्या इतर विभागाच्या तुलनेत सर्वांत कमी पगार/तुटपुंजे वेतन देऊन एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसोबत अन्याय करत आहे. वाढलेली महागाई व दैनंदिन निर्वाहासाठी मिळणारा तुटपुंजा पगार यामुळे नैराश्यातून कर्मचारी आत्महत्येसारखे पाऊल उचलत असून महाराष्ट्रात तब्बल ३२ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शासनाने विलीनीकरणाचा निर्णय न घेतल्यास यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे कर्मचाऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे आम्ही धुळे आगारातील सर्व राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी संदर्भीत संपाच्या नोटिशीनुसार रविवार मध्यरात्रीपासून संपाला पाठिंबा म्हणून लोकशाही मार्गाने संपात सहभागी होत असल्याचे कर्मचाऱ्यांनी महामंडळाच्या येथील विभाग नियंत्रक, आगार व्यवस्थापकांसह पोलिस प्रशासनाला दिले आहे.