जळगाव राजमुद्रा दर्पण । दिवाळीच्या दिवसांत एसटी, रेल्वेचे आरक्षण मिळणे कठीण झाल्यानंतर खासगी ट्रॅव्हल्सची मनमानी सुरू होते. विशेषत: पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या- येणाऱ्या प्रवाशांची सर्रास लूट चालते. यात राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी संपावर असल्याने बससेवा बंद आहे. यामुळे खासगी खासगी ट्रॅव्हल्सचे दर दोन हजारांवर पोचले असून त्यावर परिवहन विभागाचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.
दिवाळीसह अन्य सणासुदीच्या दिवसांत रेल्वेचे आरक्षण फुल असते. त्यामुळे दर वर्षीच या दिवसांत खासगी ट्रॅव्हल्सचालक अवाजवी दर आकारून प्रवाशांची लूट करतात. दीड वर्षापासून कोरोनामुळे आधीच रेल्वेगाड्यांची संख्या मर्यादित आहे, त्यात पॅसेंजर गाड्या अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या नाहीत. मर्यादित गाड्यांमध्ये प्रवाशांना सामावून घेणे केवळ अशक्य आहे. मात्र, दिवाळीसारख्या सणाला घरी प्रवास करणे आवश्यक असल्याने हीच गरज लक्षात घेऊन खासगी ट्रॅव्हल्सचालकांची मनमानी सुरू झाली आहे.
पुणे, मुंबईहून येणाऱ्या या जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. कारण, या दोन्ही गावांमध्ये खानदेशातील हजारो तरुण स्थायिक झाले असून, दिवाळीला ते घरी येत असतात. रेल्वेगाड्यांतील आरक्षण फुल असल्याने खासगी ट्रॅव्हल्समधून ते प्रवास करत असून, ट्रॅव्हल्सचालकानी हे दर तिप्पट, चौपटीने वाढविले आहेत. एरवी पुण्यासाठी ६०० ते ७०० रुपयांत प्रवास होत असला तरी सध्या हाच दर दोन हजारांवर पोचला आहे. वेगवेगळ्या ट्रॅव्हल्सचे वेगवेगळे दर असले तरी साधारणत: १४०० ते २२०० पर्यंत जादा भाडे आकारले जात आहे. मुंबईसाठीही एरवी ४००-५०० प्रतिप्रवासी दर आकारला जातो. सध्या हाच दर १५०० ते २५०० पर्यंत गेला आहे.