नवी दिल्ली राजमुद्रा दर्पण । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यवतमाळ येथील महाराष्ट्रस्थित बाबाजी दाते महिला सहकारी बँकेवर अनेक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे ग्राहकांना बँकेतून फक्त 5000 रुपयांचीच रक्कम काढता येणार आहे. सहकारी बँकेच्या ढासळत्या आर्थिक स्थितीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती बँकेने हे पाऊल उचलले आहे.
RBI ने कर्नाटकातील दावणगेरे येथील मिल्थ को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवर लादलेले निर्बंध तीन महिन्यांसाठी 7 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवले आहेत.कर्नाटकातील सहकारी बँकेवर बंदी 26 एप्रिल 2019 रोजी लागू करण्यात आली होती. त्यात वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत. गेल्यावेळी निर्बंध 7 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आले होते.
काही महिन्यांपूर्वी रिझर्व्ह बँकेने राज्यातील तीन सहकारी बँकांना दंड ठोठावला होता. यापैकी मोगावीरा सहकारी बँकेला 12 लाख, इंदापुर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला 10 लाख आणि बारामती सहकारी बँक लिमिटेडला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. तत्पूर्वी रिझर्व्ह बँकेने नियमांचे पालन न केल्याप्रकरणी गुजरातमधील ध्रांगधरा पीपल्स को-ऑपरेटिव बँकेला दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेलाही रिझर्व्ह बँकेने 6 कोटींचा दंड ठोठावला होता.