मुंबई राजमुद्रा दर्पण । देशात 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी करण्यात आली त्यानंतर महाराष्ट्रात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीवार्दाने बनावट नोटांचे रॅकेट सुरु होते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला.
नोटाबंदीच्या जवळपास एका वर्षानंतर 8 ऑक्टोबर 2017 रोजी मुंबईच्या बीकेसी परिसरात 14 कोटी 56 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा पकडण्यात आला होता. मात्र, त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण दाबले. त्यावेळी केवळ 8 लाख 80 हजार रुपयांच्या बनावट नोटा सापडल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणातील लोकांना काही दिवसांतच जामीन मिळाले होते. तेव्हा हे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे का सोपवण्यात आले नाही? या नोटा नक्की कुठून आल्या, याचा शोध का घेण्यात आला नाही, असे सवाल नवाब मलिक यांनी केले.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदी असताना गुन्हेगारांना सरकारी आयोग आणि महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले. मुन्ना यादव हा नागपूरातील कुख्यात गुंड आहे. मात्र, फडणवीस यांनी त्यांना बांधकाम महामंडळाचे अध्यक्षपद दिले. बांगलादेशी नागरिकांना भारतात वसवण्याचे काम करणाऱ्या हैदर आझमला मौलाना आझाद महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले. हैदर आजम बांगलादेशींना साथ देतो. त्याची दुसरी पत्नी बांगलादेशी आहे. मालाड पोलीस त्याची चौकशी करत आहे. बंगाल पोलिसांनी कागदपत्रं खोटे आहेत असं सांगितलं. तुमच्या कार्यालयातून पोलिसांना फोन गेला. ते प्रकरण मुख्यमंत्री कार्यालयातून फोन करुन दाबण्यात आले, असा आरोप नवाब मलिक यांनी केला.