मुंबई राजमुद्रा दर्पण । रियाझ भाटी गायब असल्याचं सांगितलं जातं. तो गायब आहे की त्याला पळवलं गेलं. रियाझ भाटीला पळवून नेण्याचं काम तर राष्ट्रवादीने केलं नाही ना हा आमचा आरोप आहे. वाझेच्या वसुली गँगमध्ये जी नावे समोर आली. त्यात रियाझचं नावही आलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने त्यांना पळवून लावले नाही ना अशी शंका येत आहे, असा गंभीर आरोप शेलार यांनी केला.
पंतप्रधान कार्यालय किंवा पंतप्रधानांच्या कार्यक्रमाशी रियाझ भाटीचा काहीही संबंध नाही. फोटोवरूनच संबंध प्रस्थापित करायचे असतील तर त्याच्यासोबत अनेकांचे फोटो आहेत, असं शेलार म्हणाले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबतचे फोटो दाखवून खळबळ उडवून दिली. फोटो दाखवून कुणालाही बदनाम करण्याचा धंदा करू नका. तुम्ही एक बोट दाखवाल तर तुमच्याकडे चार बोटं येतील, असा इशाराच त्यांनी दिला.
राज्यातील अल्पसंख्याक नेतृत्व, कार्यकर्त्यांना नेस्तानाबूत करण्याचं काम मलिक यांच्याकडून होत आहे का? असा सवाल करतानाच मुंबईतील अल्पसंख्याकांची नावं वेचून वेचून काढून त्यांना बदनाम केलं जात आहे. आर्यन खान, शाहरुख खान यांना मलिक यांनीच अडचणीत आणलं. अस्लम शेख यांचं नाव घुसडलं. आता स्वपक्षाची नावे संपल्यावर विरोधी पक्षातील हाजी अराफत, हाजी हैदर या नव्या नेतृत्वाला बदनाम करण्याचं काम सुरू आहे. अजून एका अल्पसंख्याक मंत्र्याचं नाव आणण्यासाठीच मलिक यांचा प्रयत्न आहे. हा शुद्ध कट आहे. मलिक यांनी त्याचं उत्तर द्यावं. अल्पसंख्याक समाजाने त्याची दखल घ्यावी. याला सरकारच्या इतर दोन पक्षांचा राजाश्रय आहे की नाही हे त्यांनी सांगावं, असं आव्हानच त्यांनी केलं.