मुंबई राजमुद्रा दर्पण । एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलिनीकरण करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेलं आंदोलन सुरूच आहे. भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावर एसटी कर्मचाऱ्यांचा प्रचंड मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. ठाकरे सरकार हाय हाय, एसटीचं विलनीकरण झालंच पाहिजे… अशा घोषणा द्यायला कर्मचाऱ्यांनी सुरुवात केली. यावेळी शेकडोच्या संख्येने एसटीचे कर्मचारी उपस्थित होते. आंदोलकांच्या घोषणने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर तोडगा न निघाल्याने कर्मचारी संपावर आहेत. त्यात आता भाजपने उडी घेतल्याने या आंदोलनाला हवा मिळाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात मंत्रालयावर मोर्चा काढण्यात आला. सोमय्या आणि पडळकर हे आमदार निवासातून बाहेर पडले आणि मोर्चात सामील झाले. सोमय्या आणि पडळकर आमदार निवासातून बाहेर येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये बसवले. त्यामुळे आंदोलक आणखीनच संतप्त झाले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे वातावरण अधिकच तापले होते. पोलिसांनी या आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आणखीनच गोंधळ निर्माण झाला होता.
आम्ही मंत्रालयाच्या दिशेने निघालो आहोत. पण आम्हाला अटक करत आहेत. अनेक वेळा तुरुंगात जाऊ, पण एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देऊ. कितीही वेळा अटक करा. आम्ही कामगारांना न्याय मिळवून देऊ, असं सोमय्या म्हणाले. गोपीचंद पडळकर यांनी सामान्य कामगारांसाठी आंदोलन उभे केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे केवळ एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या पाहत आहेत. त्याच्या निषेधार्थ आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहोत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी समोर येऊन कामगारांना भेटावे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणीही सोमय्या यांनी केली.
पडळकरांना किती वेळा अटक करणार आहात? सरकारमध्ये किती जोर आहे ते पाहायचंच आहे, असं सांगतानाच ठाकरे सरकार हे माफिया सरकार आहे, असा हल्लाही सोमय्या यांनी चढवला. तर आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. पण हे सरकार आम्हाला अटक करत आहे. दडपाशाही करून आमचं आंदोलन चिरडण्याचं काम सुरू आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.