(राजमुद्रा वृत्तसेवा)
तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आज कोकणात दाखल झाले. उद्धव ठाकरे यांनी पंचनामे पूर्ण होताच मदतीसंदर्भात निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी आपण फोटोसेशन करण्यासाठी आलेलो नाही सांगत विरोधकांना टोलाही लगावला. तसंच हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करत असल्याचं सांगत मोदींवर निशाणा साधला होता. यावर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर देत ठाकरेंना धारेवर धरले आहे.
“उद्धव ठाकरे कधी नव्हे ते बाहेर पडले, दीड वर्षानंतर बाहेर पडले.. त्यांनी आता इतरांना उपदेश करण्याचं काही कारण नाही. की माझा हवाई प्रवास नाही माझा जमिनीवरून प्रवास आहे. तुमचा जमिनीवर प्रवास व तुमचे पाय जमिनीवर राहणं, याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि याबद्दल खूप खूप आनंद, की तुमचे पाय सरकार आल्यापासून हवेत गेले आहेत, ते जमिनीवर आहेत तर आम्हाला आनंद आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस व दरेकरांनी काही हवाई प्रवास केलेला नाही. या दोन्ही सभागृहाच्या विरोधी पक्षनेत्यांनी दुसऱ्याच दिवशी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांचा आढावा घेतला. आता त्यांचा प्रवास पूर्ण होत आहे. दोघांनी जमिनीवरून प्रवास केला, हवेतून नाही.” असं चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.
पंतप्रधान मोदी हे महाराष्ट्रात आले नाहीत अशी टीका सत्ताधारी पक्षाकडून केली जात होती यावर प्रतिउत्तर देत चंद्रकांत पाटील म्हणाले की
“मी मुंबईत असताना तीन दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र प्रवास ठरला, पण हवामान खात्याने त्यांना प्रामुख्याने हवाई प्रवास करताना अजुनही महाराष्ट्रातील सागरी पट्ट्यात ते सोयीचं नाही अशाप्रकारची सूचना केली. म्हणून ते गुजरातला गेले पण गुजरातमध्ये जाऊन, संपूर्ण समुद्र किनाऱ्यावरील मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत घोषित केली. केवळ गुजरातसाठी घोषित केली नाही. गोवा, महाराष्ट्र सारख्या राज्यांना सूचना केल्या की तुम्ही ताबडतोब पंचनामे करा, सर्वे करा आणि तुम्ही प्रस्ताव सादर करा, मी मदत देईन. गुजरातसाठी नावाचं वेगळं पॅकेज त्यांनी घोषित केलं नाही. दोन लाख रूपये मृतांच्या नातेवाईकांना संपूर्ण देशभरासाठी त्यांनी घोषित केले.”