मुंबई राजमुद्रा दर्पण । एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन गेल्या 14 दिवसांपासून सुरूच आहे. कालपासून एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात जोरदार आंदोलन केलं आहे. भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनीही आझाद मैदानात जोरदार आंदोलन केलं. या दोन्ही नेत्यांनी एसटी कर्मचाऱ्यांसोबत अख्खी रात्रं आझाद मैदानात घालवली. कडाक्याची थंडी आणि मच्छरांचा त्रास सहन करत या दोन्ही नेत्यांनी आझाद मैदानात संपूर्ण रात्रं जागून काढली.
भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत एसटी कर्मचाऱ्यांबरोबर रात्रभर मैदानावरच झोपलेत. जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार आहे, असा निर्धार एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. सरकारमध्ये एसटीचा विलीनीकरणची मागणी घेऊन एसटी कर्मचारी आजाद मैदानात आंदोलन करत आहेत. रात्रभर एसटी कर्मचारी मैदानात जमिनीवरच झोपले होते. एसटी कर्मचाऱ्यांन बरोबरच भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे सुद्धा मैदानावर झोपले होते. आझाद मैदानात महिलांबरोबर पुरुषही मोठ्या प्रमाणावर सहभागी होते.
सरकार संपावर तोडगा काढण्याच्या विचारात दिसत नाही. सरकार चर्चेसाठी दारे खुली आहेत असं सांगतं आणि चर्चा करून सुद्धा त्यावर तोडगा काढत नाही. जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही. जर यावर ठोस निर्णय नाही झाला तर आम्ही इथून मंत्रालयावर पुन्हा एकदा धडक देऊ. इतक्या लोकांची आत्महत्या झाल्या. या लोकांच्या घरी दिवाळी साजरी झाली नाही. तरीसुद्धा सरकार या विषयाकडे संवेदनशीलतेने पाहत नाही, अशी टीका पडळकरांनी केली आहे.