नवी दिल्ली राजमुद्रा दर्पण । संजय राऊत यांनी एसटी कामगारांच्या आंदोलनावरून भाजपवर जोरदार हल्ला केला. महाराष्ट्र सरकारने कामगारांच्या बऱ्याचश्या मागण्या मान्य केल्या आहेत. कामगारांनी राजकीय पोळ्या शेकणाऱ्यांच्या हातातील बाहुले बनू नये. त्यांनी स्वत:चं, कुटुंबाचं, एसटीचं आणि महाराष्ट्राचं हित पाहावं, असं आवाहन हे मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. मुख्यमंत्री हे विश्वास ठेवावेत असे आहेत. त्यामुळे कामगारांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, असं आवाहन राऊत यांनी केलं.
अनिल परब यांचे पुतळे जाळण्यात येत आहेत. त्यामागे राजकारण आहे. पुतळे जाळण्याचं राजकारण सुरू आहे. ते कोण आहेत? त्यांचा राजकीय अजेंडा काय आहे? त्यांना कामगारांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा सरकारला बदनाम करण्यात रस आहे. कामगारांच्या चुली पेटाव्यात असं त्यांना वाटत नाही. एसटी विलीनकरण करावे अशी त्यांची मागणी आहे. पण एसटीचं विलीनिकरण होणं अजिबात शक्य नाही असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवारच म्हणाले.
कोरोनामुळे देशाची आर्थिक घडी विस्कटली गेलेली आहे. सध्या देशाची स्थिती कठिण आहे. भाजपला महाराष्ट्राच्या स्थिरतेला चूड लावायची आहे. महाराष्ट्राच्या शांततेतेला चूड लावायची आहे. त्यासाठी त्यांनी कामगारांच्या घराच्या होळ्या करायचं ठरवलं असेल तर कामगारांनी त्यातून बाहेर पडलं पाहिजे, असंही ते म्हणाले.