जामनेर राजमुद्रा दर्पण । कुंभारी येथे अल्पवयीन युवक व युवतीने तासाभराच्या अंतरात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघळकीस आली आहे. प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचे बोलले जात असून त्या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत.
कुंभार तांडा ता. जामनेर येथील अल्पवयीन युवतीने ९ नोव्हेंबरला घरात कोणी नसताना दुपारच्यावेळी विष घेत आत्महत्या केली. आई– वडील घरी आल्यानंतर सदरचा प्रकार उघडकीस आला. १६ वर्षीय युवतीने आत्महत्या केल्याने सारेच सुन्न झाले आहेत. यानंतर अवघ्या तासाभरातच १७ वर्षीय युवकाने शेतात जावून विष प्राशन करत आत्महत्या केली.
याबाबत पोलिस पाटील किंवा कुटुंबीयांनी पोलिसांना याबाबत माहिती दिलेली नव्हती. मात्र पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गावात जावून तपास केला. मुलाचा मोबाईल ताब्यात घेतला असून या मुलीच्या मेहुण्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा संदेश पवन याने त्याच्या काकाला पाठवला असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
यावेळी चौकशी केली असता दोघे अल्पवयीन असून त्यांनी प्रेमप्रकरणातून विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केल्याची चर्चा गावात आहे. चौकशीसाठी दोघांच्या नातेवाइकांना पोलिस ठाण्यात बोलावले असून तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.