जळगाव राजमुद्रा दर्पण । जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या विविध कारणांनी गाजत असलेल्या निवडणुकीत आता ‘दुश्मन का दुश्मन अपना दोस्त’ असा नवा अध्याय सुरु झाला आहे . महाविकास आघाडीतील दिग्गजांचा समावेश असलेल्या सहकार पॅनलच्या पराभवासाठी आता शेतकरी विकास पॅनलला भाजपचे बळ मिळणार असलायची नवी चर्चा सुरु आहे .
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमधील दुसऱ्या फळीच्या जिल्ह्यातील मातब्बरांनी एकत्र येऊन शेतकरी विकास पॅनल स्थापन केले आहे . प्रस्थापितांची एकाधिकारशाही मोडून काढायचा आमचा हेतू असल्याचे ते सांगतात दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटक असलेले आणि जिल्ह्याच्या राजकारणातील प्रभावी चेहरे असलेले लोक सहकार पॅनलमध्ये आहेत .
सर्वपक्षीय पॅनलमधून सर्वात आधी काँग्रेसने जाहीर फारकत घेतल्यानंतर ही निवडणूक राज्यात चर्चेत आली आहे. त्यानंतर भाजपच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरवले गेल्यानंतरची राजकीय आगपाखडही जिल्ह्याने अनुभवली. सर्वपक्षीय पॅनलच्या प्रयत्नातच आमचा विश्वासघात झाला, त्यानंतर भाजपच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यासाठी महाविकास आघाडीच्या धुरिणांनी लबाड्या केल्या, असा आरोप करीत भाजपने या निवडणुकीवर बहिष्काराची व सर्व उमेदवारी अर्ज मागे घेण्याची घोषणा केली. महाविकास आघडीची रणनीती आतापर्यंत काही प्रमाणात यशस्वीही ठरली आहे कारण प्रामुख्याने बहुतांश सोसायटी मतदारसंघांमधून बिनविरोध निवड जाहीर झालेलं लोक महाविकास आघडीचेच आहेत. २१ पैकी ११ जागा बिनविरोध जाहीर झाल्या आहेत. १० जागांसाठी ४२ उमेदवार आता मैदानात आहेत. या १० जागांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त नुकसान कसे करायचे हे आता भाजप ठरवत आहे.
एकनाथराव खडसे यांच्या विरोधात न्यायालयापर्यंत गेलेले मुक्ताईनगराचे नाना पाटील यांना सगळी साथ भाजपने दिलेली होती हे आता लपून राहिलेले नाही आता त्याच पद्धतीने महाविकास आघाडीमधील कच्चे दुवे हेरायचे आणि त्यावर नेमका हल्ला करण्याचे धोरण ठेवायचे हे भाजपचे पुढचे पॉल राहणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी शेतकरी विकास पॅनल पूर्ण ताकदीने निवडून यावे म्हणून आपली जिल्हयातील सगळी यंत्रणा या पॅनलसाठी राबवायची आणि आपल्याबद्दल नाकाने कांदे सोलणाऱ्या महाविकास आघाडीने आमचा विश्वासघात केला हे आमचे म्हणणे कसे खरे आहे, हे या तिन्ही पक्षांमधील नाराजांना (शेतकरी विकास पॅनल) हाताशी धरून दाखवून द्यायचे, याचा विचार गंभीरपणे भाजपच्या नेतृत्वाच्या पातळीवर सुरु झाला आहे.