मुंबई राजमुद्रा दर्पण। भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनीच महाविकास आघाडी सरकारला हद्दपार करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे आज सकाळी मुंबईमध्ये आगमन झाले त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये भाजपाची सत्ता येणार असून, आम्ही महाविकास आघाडी सरकार उलथून टाकू असे त्यांनी यावेळी म्हटले.
नड्डा विमानतळावर येताच राज्य भाजपाच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. स्वागत समारंभ पार पडण्यानंतर जेपी नड्डा हे ठाणे जिल्ह्यातील उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीकडे निघाले आहेत. मुंबईमध्ये आसाममधील भाजपा आमदारांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले असून, उद्या नड्डा यांच्या हस्ते या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन होणार आहे. यावेळी जेपी नड्डा हे भाजपाच्या नेत्यांना संबोधित करतील.