औरंगाबाद राजमुद्रा दर्पण। शहरात 54 अधिकाऱ्यांच्या पथकाने शहरातील पद्माकर मुळे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आणि बिल्डर जुगलकिशोर तापडिया यांचे निवासस्थान आणि कार्यालय अशा एकूण सात ठिकाणी छापे मारले. रात्री उशीरापर्यंत या ठिकाणांवरील सामान आणि कागदपत्रांची तपासणी सुरु होती. दरम्यान, गुरुवारी रात्रीच ईडीची पथके कागदपत्र आणि पुराव्यांसह मुंबईत रवाना झाली तर एक पथक अजूनही शहरात आहे.
तापडिया यांच्या निराला बाजार येथील बंगल्यावर ईडीने धाड टाकली. तेथे एक महिला अधिकारी व पाच पुरुष अधिकार्यांच्या पथकाने तपासणी केली. रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरु होती. बंगल्यातील प्रत्येक खोलीत जाऊन त्यांनी झडती घेतली. काही महत्त्वाची कागदपत्रे त्यांनी जप्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. तसेच 12 जणांचे पथक मनमंदिर ट्रॅव्हल्स कार्यलयाच्या मागील कार्यालयात धडकले. त्यांनी पहिल्या मजल्यावरील तापडिया यांच्या कार्यालयात छापा मारून कागदपत्रे हस्तगत केली. नंतर त्याच इमारतीत दुसऱ्या मजल्यावरील पद्माकर मुळे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या कार्यालयात गेले. रात्री उशिरापर्यंत पथक तेथे झाडाझडती घेत होते. उद्योजकांचा मुलगा आणि ऑफिसचा स्टाफ यावेळी तेथे हजर होता.