औरंगाबाद राजमुद्रा दर्पण । औरंगाबादमध्ये शिवसनेच्या कार्यकर्त्यांच्या जमावात संजय राऊत आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मात्र या मोर्चाला शहर पोलिसांची कोणतीही परवानगी नव्हती, अशी माहिती समोर आली आहे. औरंगाबाद पोलिसांनी ही माहिती दिली असून, या प्रकरणी मोर्चाच्या आयोजकांवर कारवाई केली जाईल, असं वक्तव्यही औरंगाबादचे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी केलं आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांवर या मोर्चा प्रकरणात गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
तसेच मोर्चासाठी परवानगी नसेल तर एवढा फौजफाटा का तैनात करण्यात आला, या प्रश्नाचं उत्तर देताना, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कर्तव्य बजावणं आवश्यक असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. त्यामुळे शिवसेना मोर्चाच्या आयोजकांवर कारवाई होणार का, याकडे सामान्य नागरिकांचं लक्ष लागलं आहे.
13 ऑक्टोबर रोजी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वात क्रांती चौकातून सेनेच्या आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. महागाई विरोधातील सामान्य जनतेचा हा आक्रोश.. ही आक्रोशाची ठिणगी औरंगाबादेत पेटली असून तिचा वणवा दिल्लीपर्यंत पसरवणार, असा इशारा संजय राऊत यांनी यावेळी दिला. शहरातील क्रांती चौकातून निघालेला हा मोर्चा गुलमंडीपर्यंत गेला. तेथे संजय राऊत यांनी जाहीर भाषण करून मोर्चातील भूमिका स्पष्ट केली. या मोर्चात शेकडो शिवसैनिकांसह औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, मंत्री संदीपान भूमरे आदींचा सहभाग होता.