वर्धा राजमुद्रा दर्पण । वर्ध्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर शिरीष गोडे यांनी थेट भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे वर्ध्यातील या राजकीय भूकंपाने भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तर जिल्ह्यातील काँग्रेसचं बळ वाढलं आहे.
काँग्रेसच्या जनजागरण यात्रेदरम्यान वर्धा जिल्ह्यात भाजपला जबर धक्का बसलाय. काँग्रेसच्या प्रभातफेरीनंतर सकाळीच काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांच्यासोबत भाजपा जिल्हाध्यक्ष शिरीष गोडे करंजी भोगे येथे आले. त्यानंतर गोडे यांनी पालकमंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गोडे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश करताच राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे.
राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या डॉक्टर शिरीष गोडे यांनी 2008 मध्ये भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला होता. मागील काही दिवसांपासून गोडे भाजपच्या कार्यप्रणालीवरून अस्वस्थ होते. भाजपची शेतकरी विरोधी भूमिका आणि वाढती महागाई यावरून त्यांनी नाराजीही व्यक्त केली होती. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राजीनामाही पाठवला होता कार्यवाहीच आश्वासन मिळाल्यानतर गोडे यांनी वेट अँड वॉच केलं. या कालावधीत गोडे यांच मन वळवण्याचा प्रयत्न झाला. पण बदल दिसत नसल्याचं सांगत अखेर डॉक्टर गोडे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे महासचिव केसी वेणूगोपाल, महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री सुनील केदार, आमदार रणजित कांबळे, जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला.