जळगाव राजमुद्रा दर्पण । कार्तिकी एकादशीनिमित्त श्रीराम मंदिर संस्थानतर्फे दरवर्षाप्रमाणे रथोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून रथोत्सवाला दीड शतकी परंपरा लाभलेली आहे. जय श्री रामाच्या जयघोषात रथोत्सव उत्सवाला सुरुवात करण्यात आली.
कार्तिकी एकादशीनिमित्त रथाची मिरवणूक निघेल परंतु, बारा तासांची मिरवणुक यंदा सहा तासांचीच होणार आहे. रथोत्सवाचे यंदा १४९ वे वर्ष आहे. आज पहाटे चारला काकडारती, प्रभु श्रीरामांच्या उत्सवमूर्तीस महाभिषेक, सकाळी सात महाआरती, ७.३० ते ८.३० सांप्रदायिक पंचपदी भजन, तर मंदिराच्या प्रांगणात सकाळी १०.३० वा. गादीपती हभप मंगेशमहाराज जोशी यांच्याहस्ते विधीवत रथाचे पूजन होऊन रथ मिरवणुकीला सुरवात होईल.
श्रीराम मंदिरापासून मिरवणूक निघून कोल्हेवाडा, आंबेडकर नगर, चौधरीवाडा, तेली चौक, मंदिराच्या मागची गल्ली, बोहरा गेल्ली, सुभाष चौक दाणाबाजार, पीपल्स बँक, शिवाजीरोड, नेवे ब्रदर्स, घाणेकर चौक, गांधी मार्केट, सुभाष चौक, सराफा बाजारातील श्री महालक्ष्मी मंदिर, मरिमाता मंदिर, भिलपुरा मार्गे येताना लालशा बाबांच्या समाधीवर पुष्पचादर अर्पण करुन, दधिची चौक, बालाजी मंदिरमार्गे मिरवणूक रथचौकात येईल. यंदा वेळेची मर्यादा घालून देण्यात आली असून भक्तांनी लांबूनच रथाचे दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.