दिल्ली राजमुद्रा दर्पण | रेल्वे प्रवासी आरक्षण प्रणाली पुढील सात दिवस रात्री सहा तास बंद राहणार आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून घोषणा करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सध्या रेल्वे प्रवासी आरक्षण यंत्रणा अपडेट करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे 15 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून ते 21 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत असे सात दिवस रेल्वे तिकीट सेवा रात्री सहा तास बंद राहणार आहे. 21 तारखेनंतर पुन्हा एकदा तिकीट सेवा सुरळीत सुरू होईल.
एक्सप्रेस आणि कोरोना काळात असलेली ट्रेनची संख्या आणि आता नव्याने सुरुवात करण्यात आलेल्या ट्रेन यांची माहिती अपडेट करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासी आरक्षण प्रणाली दिवसातून काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून ही सर्व कामे रात्री केली जाणार आहेत. पुढील सात दिवस रेल्वेची ही यंत्रणा रात्री सहा तासांसाठी बंद असेल. याकाळात नागरिकांना तिकीट बूक करणे, तिकीट रद्द करणे, ट्रेनची चौकशी करणे यासारख्या गोष्टी करता येणार नाहीत. रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार या सहा तासांच्या कालावधीत रेल्वेशी संबंधित डेटा अपडेट करण्याचे काम करण्यात येणार आहे.