नाशिक राजमुद्रा दर्पण । शिक्षण खातं हे किती महत्त्वाचं आहे. त्याची जबाबदारी पेलणं किती कठीण आहे. याचा प्रत्यय राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आला. एवढंच नव्हे तर या खात्यातून सुटका करा अशी विनंतीच त्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना केली होती.
एका कार्यक्रमात भाषण करताना शरद पवार यांनी शिक्षणाचं महत्त्व सांगतानाच हे खातं मिळाल्यानंतर कशी दमछाक उडाली होती याचा किस्साच सांगितला. गेल्या अनेक वर्षापासून मी राजकारणात आहे. एकदा मी शिक्षण मंत्री होतो. तेव्हा शिक्षकांचं शिष्टमंडळ आपल्या मागण्या घेऊन यायचे. त्यांच्या मागण्या मान्य केल्या की कोट्यवधी रुपयांचे बर्डन येत होतं. त्यावेळी कळालं शिक्षण मंत्र्यांएवढं अवघड काम नाही. तेव्हा मला शिक्षण संघटनेचे अनेक लोक भेटत. मी कच्चा विद्यार्थी आहे असं त्यांना वाटायचं. एकदा यशवंतराव चव्हाण साहेबांनी मला विचारलं, मंत्रिमंडळात तुम्हाला कोणतं काम करायचं आहे? मी त्यांना सांगितलं शिक्षण खात्यातून माझी सुटका करा, कृषी खातं द्या. त्यानंतर मी कृषी खात्याचं काम सुरू केलं, असा किस्सा पवारांनी ऐकवताच एकच खसखस पिकली.
शिक्षणाचा विस्तार करण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे. महाराष्ट्रात शिक्षण विस्ताराची जबाबदारी एका ठराविक वर्गानंतर खासगी शिक्षण संस्थानी उचलली. अनेकांनी शिक्षणसंस्था सुरू केल्या, शिक्षणसंस्था वाढवण्याचं काम अनेकांनी केलं. अनेक मान्यवरांनी शिक्षणसंस्था मोठ्या केल्या आणि ज्ञानदानाचं काम केलं. शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करण्याचं काम खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलं. महात्मा फुले यांनी शिक्षण क्षेत्राला वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याचं काम केलं. शिक्षणाचा जागर करण्याचं काम खऱ्या अर्थानं महात्मा फुलेंनी केलं, असं गौरवोद्गागार त्यांनी काढलं.