मुंबई राजमुद्रा दर्पण । शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाचे न्यायाधीश एस. एच. सातभाई यांनी हा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. ईडीने आनंदराव अडसूळ यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.
आनंदराव अडसूळ यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर अडसूळ यांनी ईडीची कारवाई टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावेळी उच्च न्यायालयाने त्यांना कोणतीही सवलत न देता मुंबई सत्र न्यायालयात दाद मागण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अडसूळ यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यात अटकपूर्व जामीन अर्जावर जोवर सुनावणी पूर्ण होत नाही तोवर तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात यावा, असा अर्ज केला होता. त्या अर्जावर आज कोर्टाने निर्णय दिला.
आनंदराव अडसूळ सिटी बँकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात बँकेत 900 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. अडसूळांचे नातेवाईक बँकेच्या संचालक मंडळावर होते. त्याचवेळी कर्ज वाटपात अनियमितता आणि NPA मध्ये घसरण झाली. घसरणीमुळे बँक गेल्या 2 वर्षांपासून बँक बुडीत आहे. खातेदारांनी अनेक वेळा अडसूळ यांची भेट घेतली पण अडसूळांनी खातेदारांची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचा आरोप आहे.