धुळे राजमुद्रा दर्पण । अहमदनगर रुग्णालय दुर्घटना प्रकरणी डॉक्टर व परिचारिकांचे निलंबन केले आहे. या प्रकरणी धुळे जिल्हा रुग्णालयात परिचारिकांचा कॅन्डल मार्च काढून एक दिवसीय संप पुकारला आहे. आज दिवसभर संप पुकारल्यानंतर प्रशासनातर्फे या बडतर्फ केलेल्या अहमदनगर येथील परिचारिका व डॉक्टरांवरील निलंबन मागे घेतले न गेल्यास उद्यापासून अनिश्चित वेळेसाठी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी आंदोलनकर्त्या परिचारिकांनी दिला आहे.
अहमदनगर येथील रुग्णालयामध्ये आग लागून रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर संबंधित प्रशासनाने या ठिकाणी कार्यरत असलेल्या परिचारिका व डॉक्टरांवर या दुर्घटनेचा दोष लावत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करीत त्यांचे निलंबन केले. या घटनेचा निषेध करण्यासाठी धुळ्यातील परिचरिकांनी तीन दिवसांपासून काळ्या फिती लावून प्रशासनाचा निषेध केला. परंतु त्यानंतरही प्रशासनातर्फे कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही, म्हणून संपूर्ण दिवस संपाचे हत्यार धुळ्यातील परिचारिकांनी उगारले आहे.