नाशिक राजमुद्रा दर्पण। आमदार सुहास कांदे आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यातील जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटप वादावर तूर्तास पडदा पडल्याचे दिसत आहे. मंगळवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक होती. आपले सध्या तरी समाधान झाले आहे, असे आमदार सुहास कांदे यांनी सांगितले. दुसरीकडे 90 टक्के निधी आत्ताच मिळाल्याचा दावा, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. या दोघांच्या वक्तव्यावरून सध्या तरी दोघांनी आपल्यापल्या तलवारी म्यान केल्याचे दिसत आहे.
पालकमंत्री भुजबळ म्हणाले, 824 पैकी एकूण 796 कोटी 4 लाख खर्च झाले आहे. हा निधी कोरोनासाठी खर्च करण्याचे बंधन होते. आतापर्यंत उपलब्ध निधीच्या तुलनेत फक्त 10.50 टक्के निधी खर्च झाला आहे. उर्वरित 90 टक्के निधी आताच प्राप्त झाला आहे. मार्च अखेर उर्वरित निधीच्या खर्चाचे नियोजन केले जाईल. गेले 10 महिने केवळ 10 टक्के खर्चाची परवानगी होती. कोरोनावर खर्च करणे बंधनकारक होते. उर्वरित निधीसाठी ऑक्टोबर अखेर परवानगी मिळाली. आलेला 60 टक्के निधी थेट जिल्हा परिषदेकडे जातो. 70 टक्के निधी त्या-त्या विभागाला जातो. जिल्हाधिकाऱ्यांना केवळ 30 टक्के निधी खर्चाचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले.