मुंबई राजमुद्रा दर्पण । मुंबईतील आझाद मैदानावर शेकडो एसटी कर्मचारी आंदोलनाला बसले आहेत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोतही आझाद मैदानावर ठाण मांडून आहेत.
अनिल परब म्हणाले की, मी पडळकर आणि खोत यांच्याशी दोन वेळा बोललो आहेत. त्यांच्यासमोर सरकारचे प्रस्ताव ठेवले आहेत. ते एसटी कर्मचाऱ्यांशी बोलून पुन्हा येतो म्हणून गेले आहेत. कदाचित कामगारांना समजावण्यात ते कमी पडले असतील. नाहीतर कामगार त्यांचं ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतील. मात्र, सर्वांसाठी चर्चेची दारं खुली आहेत. कुणीही आमच्याकडे चर्चेसाठी यावं, असं आवाहन परब यांनी केलंय.
एसटी कमर्चाऱ्यांच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीची आज संध्याकाळी 5 वाजता बैठक होणार आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीसाठी एसटी कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनाही बोलावल्याचं अनिल परब यांनी सांगितलं. तसंच एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या काय आहेत, त्यांना काय देता येऊ शकतं, याबाबत संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी चर्चा सुरु आहे. आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी पुन्हा एकदा बोलणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा करणार असल्याचं परब यांनी सांगितलं. तसंच एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचं आवाहन परब यांनी पुन्हा एकदा केलं आहे.