पाचोरा राजमुद्रा दर्पण । सावखेडा बु. (ता.पाचोरा) येथील सुपुत्र जवान मंगलसिंग जयसिंग परदेशी (वय ३५) हे पंजाब राज्यातील पठाणकोट येथे शनिवारी मध्यरात्री देशसेवा बजावीतत असतांना अतिरेक्यांच्या हल्ल्यात वीरमरण झाला. त्यांना आज (१६ नोव्हेंबर) वीर जवान मंगलसिंग परदेशी यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.
जवान मंगलसिंग परदेशी हे ७३४ टीपीटी येथे नियुक्तीस होते. १४ नोव्हेंबरला गेट नंबर दोनवर गार्ड ड्युटी बजावत असताना नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात त्यांच्या खांद्याला गोळी लागून ते जखमी झाले होते. त्यांना लष्करी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शहीद मंगलसिंग परदेशी यांना चार वर्ष सेवावाढ मिळालेली होती. गावातून लष्कराच्या वाहनातून अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी मार्गावर रांगोळ्यांचा सडा घालण्यात आला होता. ‘अमर रहे अमर रहे मंगलसिंग राजपूत अमर रहे, भारत माता की जय..’ अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा अंत्यविधीच्या ठिकाणी पोहचली. शहीद मंगलसिंग परदेशी यांचा मुलगा चंदन यांनी पार्थिवाला मुखअग्नी देऊन अंत्यसंस्कार केले.
वीर जवान जवान मंगलसिंग परदेशी हे दसऱ्यानिमित्त एक महिन्यासाठी घरी आपल्या कुटुंबासह सुटीवर आले होते. त्यानंतर ते देशसेवेसाठी पठाणकोट येथे हजर झाले होते. मंगलसिंग परदेशी यांची शहीद झाल्याची वार्ता सावखेडा बु. गावात पोहचताच एकच शोककळा पसरली होती. तर परदेशी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांच्या पश्चात वृध्द आई, वडील, दोन भावंडे, पत्नी किरण, मुलगा चंदन, चंचल, कांचन या दोन मुली असा परिवार आहे.